भारताने चर्चेच्या टेबलावर यावे यासाठी दबाव म्हणून दहशतवादाचा धोरणासारखा वापर करणाऱ्या पाकिस्तानबरोबर चर्चेची शक्यता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावली आहे. बुधवारी एका कार्यक्रमात जयशंकर यांना काश्मीर आणि पाकिस्तान बरोबरच्या संबंधांबद्दल विचारण्यात आले.

तुम्ही दोन शब्द उच्चारलेत. काश्मीर आणि पाकिस्तान. मी त्यात तुम्हाला फरक समजावून सांगतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर मुलभूत मुद्दा आहे असे मला वाटत नाही. आमच्यामध्ये जे मुद्दे आहेत त्यातला तो एक भाग आहे असे मला वाटते असे जयशंकर यांनी उत्तर दिले. दहशतवादाच्या मार्गावरुन चालणाऱ्या देशाबरोबर चर्चा कशी होऊ शकते? असा सवाल जयशंकर यांनी केला.

प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याबरोबर बोलायचे असते. पण दहशतवादाचा प्रसार करणाऱ्यांबरोबर कसे बोलू शकतो असा सवाल जयशंकर यांनी केला. जयशंकर यांनी यावेळी मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिला. भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट का बंद झाले? या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना खूप महत्वाच्या असतात.

रात्री तुम्ही दहशतवादी कारवाया कराल आणि दिवसा सामान्य व्यवहार सुरु राहतील हा संदेश मला द्यायचा नाही. भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली तर तसा संदेश जाईल. त्यामुळे रात्री दहशतवाद आणि दिवसा क्रिकेट चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत-पाकिस्तानमधला इतिहास हा सामान्य इतिहास नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.