आजार गंभीर असो वा साधा. त्यातून बरं व्हायचं असेल, प्रत्येकाला डॉक्टरांचीच मदत घ्यावी लागते. असं म्हणतात की, मृत्यूशी झूंज देणाऱ्या रुग्णासाठी डॉक्टरच देव असतात. पण, डॉक्टरांकडूनच जर चूक झाली तर? अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने गुगलवरील माहितीच्या आधारे एका चिमुकल्याला इंजेक्शन दिलं. इंजेक्शननंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चिमुकल्याच्या आईवडिलांनी केला आहे. मात्र, हे आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत.

ओडिशामधील दाबुगाम येथील एका हेल्थ केअर सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. सहा महिन्याच्या बाळाला न्यूमोनिया झाला होता. आई-वडील चिमुकल्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी गुगलवर माहिती घेऊन त्या बाळाला इंजेक्शन दिलं. त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप आईवडिलांनी केला आहे.

“आमच्या मुलाला ३० मार्चच्या रात्री खोकल्याच त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला बरं वाटत नसल्याने आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच ३१ मार्च रोजी बाळाला दाबुगाम येथील आरोग्य सेवा केंद्रात दाखल केलं. बाळाला तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी गुगलवर औषध शोधलं. त्यानंतर औषधांची यादी लिहून दिली,” असा आरोप बाळाचे आई-वडिल अमृता आणि प्रशांत बिसोई यांनी केला आहे.

“डॉक्टरांनी मुलाला इंजेक्शन देण्याचा सल्ला आम्हाला दिला. त्याला कोणतं इंजेक्शन दिलं पाहिजे हे डॉक्टरांना माहित नव्हतं. त्यांनी ते गुगलवर शोधलं. गुगलवरून माहिती घेतली. जेव्हा त्यांनी मुलाला इंजेक्शन दिलं, त्यानंतर काही क्षणातच माझ्या बाळाचे डोळे बंद झाले आणि त्याचा मृत्यू झाला,” असं प्रशांत यांनी ओडिशा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “डॉक्टरांनी आम्हाला वेळेवर उमरकोट रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला नाही. जिथे आमच्या मुलाचा चांगला उपचार झाला असता.”

दुसरीकडे गुगल सर्च करून औषधोपचार केल्याचा आरोप आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याांनी फेटाळून लावला आहे. वैद्यकीय अधिकारी सुभासीस साहू म्हणाले, “उपचारात कोणताही निष्काळजीपणा नव्हता. मुलगा न्यूमोनियाने त्रस्त होता आणि त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. योग्य औषधे वापरली गेली. पण, आजार शेवटच्या टप्प्यात होता. ते बाळाला उमरकोटच्या रुग्णालयात घेऊन गेले होते, परंतु त्याची प्रकृती खालावल्यानंतर मधुनच ते इथे परत आले. जेव्हा ते इथे परत आले तोपर्यंत त्या बाळाची प्रकृती गंभीर झाली होती,” असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.