सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य त्रस्त असतानाच ओडिशामध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. भारतात पेट्रोलच्या तुलनेत डिझेल नेहमीच स्वस्त असते पण ओडिशा हे एकमेव राज्य अपवाद ठरले आहे. ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने डिझेलच्या या दरवाढीसाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

आजही देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पण ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर डिझेलसाठी १३ पैसे जास्त मोजावे लागत आहे. सोमवारी भुवनेश्वरमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८०.२७ पैसे आहे तर प्रतिलिटर डिझेलसाठी ८०.४० पैसे मोजावे लागत आहेत.

ओडिशामध्ये पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे असे उत्कल पेट्रोलियम डिलर्स असोशिएशनचे सरचिटणीस संजय लाथ यांनी सांगितले. अन्य राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी व्हॅटचे दर वेगवेगळे आहेत पण ओडिशामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एकच २६ टक्के व्हॅट आकारला जातो. इंधनाच्या या वाढत्या किंमतीमुळे ओडिशात डिझेलच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

डिझेलच्या किंमती वाढल्या तर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढतात. त्यामुळे डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रत्येक सरकारचा प्रयत्न असतो. आतापर्यंत १३ राज्यांनी व्हॅटचे दर कमी केले आहेत. ओदिशाने अद्यापपर्यंत व्हॅटचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.