विश्वासघातकी पाकिस्तानचा पुन्हा एकदा क्रूर चेहरा समोर आला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही दुर्देवी घटना घडली. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे.

सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी रेंजर्स सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. भारताकडूनही पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला जशास तसे उत्तर दिले जात आहे.

रविवारी भारताकडे गोळीबार थांबवण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय चौक्यांवर तोफगोळयांचा वर्षाव केला. भारतानेही पाकिस्तानच्या या आगळीकीला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. सोमवारी पाकिस्तानने सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले.

पाकिस्तानने अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये अनेक गावकरी अडकून पडले होते. भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला त्याचा भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले होते.

बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी (दि. २० मे) फोन करून बीएसएफला गोळीबार रोखण्याची विनंती केली. भारताच्या त्वरीत आणि चोख प्रत्युत्तरामुळे धास्तावलेल्या पाक रेंजर्सला फोन करावा लागला. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबाराला बीएसएफकडून मागील तीन दिवसांपासून योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे. नेमक्या ठिकाणी गोळीबार केला जात असल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सचे मोठे नुकसान होत होते.