पाकिस्तानच्या लारकाना शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नम्रिता चंदानी असे या मुलीचे नाव आहे. ती बिबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती. सोमवारी कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये नम्रिता मृतावस्थेत आढळली. द्वेष भावनेतून तिची हत्या झाल्याचा संशय आहे. घोटकी तालुक्यातील मीरपूर माथीलो येथे नम्रिता चंदानीचे घर आहे.

नम्रिताचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. गळयाभोवती फास होता तसेच तिची खोली आतमधून बंद होती. नम्रिताने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली याबद्दल आताच काही बोलणे घाईचे होईल असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे आमच्या मुलीची हत्या करण्यात आली असा आरोप कुटुंबियांनी केली आहे.

नम्रिताची हत्या झाली आहे असा आरोप तिच्या भावाने प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना केला. माझी बहिणीकडे ओढणी असायची तिच्या गळयावर जे व्रण आहेत ते केबलच्या वायरचे आहेत असे त्याने सांगितले. तिच्या शरीराच्या अन्य भागांवर जे व्रण दिसत आहेत त्यावरुन कोणीतरी तिला पकडल्याचे दिसते. आम्ही अल्पसंख्यांक आहोत. आमच्यामागे उभे राहा असे आवाहन नम्रिताच्या भावाने केले आहे.

शवविच्छेदनासाठी आम्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कराचीहून नम्रिताचे आई-वडिलांच्या येण्याची पोलीस वाट पाहत आहेत. नम्रिताचे सहकारी तिला बोलवण्यासाठी तिच्या रुमवर गेले होते. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहाच्या वॉचमनने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी नम्रिता बिछान्यावर पडलेली होती.

प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटते पण शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे मेडिकल कॉलेजच्या व्हाइस चान्सलर अनिला रेहमान म्हणाल्या. दोन वर्षांपूर्वी एक जानेवारी २०१७ रोजी सिंध विद्यापीठात शिकणारी नायला रिंद ही विद्यार्थिनी मृतावस्थेत सापडली होती. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.