करोना म्हणजे कोविड १९ विषाणूने मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशी बिघडते याचा उलगडा वैज्ञानिकांनी केला असून त्यातून करोनावर नवीन औषध विकसित करता येऊ शकते.

‘नेचर इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात म्हटले आहे की, अनेक विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीतील टी पेशींवर परिणाम होत असतो. या प्रक्रियेत प्रतिकारशक्ती प्रणालीची दमछाक होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, कोविड १९ रुग्णांमध्येही प्रतिकारशक्ती प्रणालीवर असाच विपरित परिणाम होऊन तिची दमछाक होते. त्यामुळे कोविड १९ रोगावर औषध शोधताना प्रतिकारशक्ती खूपच कमी होण्याची प्रक्रिया रोखण्यावर भर द्यावा लागणार आहे.

आधीच्या अभ्यासानुसार विषाणूंच्या प्रादुर्भावाने टी पेशींच्या कार्यावर परिणाम होतो. कालांतराने म्हणजे काही दिवसांतच त्या पेशी बिघडतात. नवीन उपचारात उपयोगी पडतील असे काही मध्यस्थ घटक वैज्ञानिकांनी शोधून काढले असून त्यांच्या मते काही लोक कोविड १९ विषाणूने जास्त आजारी पडतात तर काहींमध्ये कमी लक्षणे दिसतात किंवा लक्षणे दिसत नाहीत.

मेलबर्न विद्यापीठाचे डॅनियल उस्नायडर यांच्या मते कमी व जास्त लक्षणे असलेल्या उंदरांचा अभ्यास केला असता त्यात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. कमी लक्षणे व जास्त लक्षणे असलेल्या उंदरांच्या रेणवीय व कार्यात्मक पातळीवर अनेक फरक दिसून आले आहेत. ज्या उंदरात जास्त लक्षणे दिसून आली त्यांच्यात टी पेशींचे कार्य काही दिवसातच मंदावले तर ज्यांच्यात लक्षणे कमी होती  त्यांच्यात टी पेशी सदैव कार्यरत राहिल्या. कोविड १९ व इतर विषाणू संसर्गात टी पेशींना आधीच्या पातळीवर सुधारले जाऊ शकते किंबहुना त्यांच्यात अपेक्षित बदल घडवून त्यांची कार्यक्षमता वाढवता येईल असे मेलबर्न विद्यापीठाचे अ‍ॅक्सेल कॅलीस यांनी म्हटले आहे.