पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच त्रिपुरा सरकारमधील मंत्री मनोज कांती देव यांनी महिला मंत्र्याबरोबर असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्रिपुरामध्ये भाजपाचे सरकार आहे. आगरतळा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर असताना मनोज कांती देव यांनी त्यांच्या पुढे उभ्या असलेल्या संताना चाकमा यांच्या कमरेवर हात ठेवला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मनोज देव यांनी अत्यंत अयोग्य पद्धतीने संताना चाकमा यांना स्पर्श केला. मनोज देव यांचा इरादा लक्षात येताच संताना चाकमा यांनी लगेच मनोज कांती देव यांचा हात दूर केला. संताना चाकमा या त्रिपुरा सरकारमध्ये सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. त्या सक्षम झाल्या पाहिजेत असे आपल्या भाषणांमधून सांगत असतात.

आता चक्क मोदींसमोरच त्यांच्याच पक्षाच्या सरकारमधील मंत्र्याने असे वर्तन केले. शनिवारी ९ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात ही घटना घडली. त्रिपुरात विरोधी पक्षात असलेल्या डाव्यांनी मनोज कांती देव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री मंचावर असताना मनोज कांती देव यांनी महिला मंत्र्याबरोबर केलेले वर्तन अत्यंत चुकीचे आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असे डाव्या आघाडीचे संयोजक बीजान धार यांनी सांगितले. संताना चाकमा या त्रिपुरा सरकारमधील एकमेव महिला मंत्री आहेत.