राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय लढाई टीपेला पोहोचली आहे. आज राजस्थानात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. बंडखोरी करुन आपल्याच पक्षाला आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांना अखेर आज काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवले.

दरम्यान राजस्थानात वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार राजकुमार रौत यांनी सरकारवर खूप गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला जबरदस्तीने थांबवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. राजकुमार रौत यांनी स्वत:चा एक व्हिडीओ बनवून पाठवला आहे. “मी गेल्या तीन दिवसांपासून आमदार निवासामध्ये होतो. आज मी माझ्या मतदारसंघात जाण्यासाठी निघालो, तेव्हा पोलिसांच्या तीन-चार गाडया माझ्या गाडीच्या पुढे-मागे होत्या. एकप्रकारे मला कैद करुन ठेवण्यात आले आहे. पोलीस मला कुठलीही हालचाल करु देत नाहीयत. माझ्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या आहेत. एका आमदाराला खूप वाईट वागणूक दिली जात आहे” असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. राजकुमार रौत हे चौरासी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

आणखी वाचा- “सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून रचलं होतं सरकार पाडण्याचं षडयंत्र”, गंभीर आरोप

आणखी वाचा- ‘आ बैल मुझे मार’ हे सचिन पायलट यांचं धोरण, अशोक गेहलोत यांची टीका

राजस्थानात संख्याबळ नेमके कोणाकडे आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुरेसे संख्याबळ असल्याचे सांगितले आहे, तर सचिन पायलट यांनी त्यांना २५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या राजकीय लढाईत बाजी नेमकं कोण मारणार? की, भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार ते चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही.