News Flash

मृत्यू कधीच बदनाम होत नाही, काँग्रेसलाही तेच वरदान -मोदी

जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक काम करणारे तर दुसरे श्रेय लाटणारे, श्रेय लाटण्यापेक्षा काम करणारे व्हा

राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदी

जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक काम करणारे तर दुसरे श्रेय लाटणारे, श्रेय लाटण्यापेक्षा काम करणारे व्हा कारण तेथे स्पर्धा कमी आहे, असे इंदिरा गांधी यांनीच म्हटले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला. मृत्यूला एक वरदान असते ते म्हणजे तो कधीच बदनाम होत नाही, मृत्यूवर कधीही आरोप येत नाही, तसेच वरदान काँग्रेस पक्षाला आहे, काँग्रेसवर कितीही टीका केली तरी विरोधकांवर टीका केली अशा बातम्या येतात, काँग्रेस कधीही बदनाम होत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आणि जनहिताच्या अनेक मुद्दय़ांनाही स्पर्श केला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरळीत सुरू झाले ही आनंदाची बाब आहे, जीएसटी विधेयकासह अन्य महत्त्वाची विधेयके मंजूर होणे गरजेचे आहे, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात समन्वय आवश्यक आहे, लोकसभेत मंजूर झालेली विधेयके राज्यसभेतही मंजूर होऊ द्या, आपल्या कामांकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहिले जाते, मात्र काँग्रेस सत्तेत असताना दुर्बीण घेऊन काम केले असते तरी खूप झाले असते, अशी टीकाही या वेळी मोदी यांनी केली.
संसदेच्या या सत्रात विरोधकांकडून मिळणारे सहकार्य आणि निर्माण झालेले पोषक वातावरण या पाश्र्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि अन्य विधेयके मंजूर करण्याचे आवाहन राज्यसभेत केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात विरोधकांची विशेषत: काँग्रेसची खिल्ली उडविली. मोदी यांनी आपल्या भाषणात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. राज्यसभा हे नव्या कल्पनांचे दालन आहे आणि राज्यसभा व लोकसभा यांच्यात समन्वयाची गरज आहे कारण दोन्ही सभागृहे रचनेचाच एक भाग आहेत, असे मोदी म्हणाले. पं. नेहरू यांच्या विचारांना आपण महत्त्व देऊ या आणि सर्व प्रलंबित विधेयके या अधिवेशनात मंजूर करायला हवीत. लोकसभेत अनेक विधेयके मंजूर झाली ती राज्यसभेत अडकून पडली आहेत. राज्यसभेत जे घडते त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभेत उमटतात, त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

सरकारवर नामुष्की
आभारदर्शक ठरावासंदर्भात आलेल्या जवळपास ३०० सुधारणांचा संदर्भ देऊन मोदी यांनी त्या सुधारणा मागे घेण्याचे विरोधकांना आवाहन केले. राष्ट्रपतींच्या कार्यालयाचा सन्मान राखण्यासाठी आणि सभागृहाच्या उच्च परंपरेचे जतन करण्यासाठी आभारदर्शक ठराव एकमताने मंजूर करावा, असे आवाहनही या वेळी मोदी यांनी केले.मोदी यांनी आवाहन केलेले असतानाही सभागृहाने विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मांडलेली सुधारणा ९४ विरुद्ध ६१ अशा मतांनी मान्य केल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. राजस्थान आणि हरयाणात पंचायत निवडणुका लढविण्यासाठी शालान्त परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष असलेला कायदा करण्यात आला असून त्या पाश्र्वभूमीवर अभिभाषणात पंचायत निवडणूक लढविण्याचा सर्वाना अधिकार असल्याच्या कायद्याशी बांधिलकी नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:58 am

Web Title: in rajya sabha narendra modi equates congress to death and concludes speech with poem
टॅग : Rajya Sabha
Next Stories
1 लष्कराचे ‘यमुना पर्यटन’ कुणाच्या दबावावरून ?
2 अद्याप हिलरी क्लिंटन यांना संमिश्र यश
3 चीनमधील जोडप्याकडून आयफोनसाठी मुलीची विक्री
Just Now!
X