सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे तब्बल ३५ वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. १८ एप्रिल रोजी सिनेमागृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमागृह सुरू करण्याचं पहिलं लायसन्स एएमसी एंटरटेन्मेंटला देण्यात आलं आहे. ही अमेरिकी कंपनी पुढील ५ वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या १५ शहरांमध्ये ४०  पेक्षा जास्त सिनेमागृह सुरू करणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी देशाच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून येथील चित्रपटांवरील बंदी हटवण्यात आली होती. ३५ वर्षांनी सुरू होणा-या चित्रपटगृहांमध्ये सर्वप्रथम ब्लॅक पॅंथर हा सिनेमा दाखवला जाईल असं सांगितलं जात आहे.

वर्ष २०१७ मध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वातील सरकारने सिनेगृहांवरील बंदी हटवली होती, आणि सिनेगृहांना परवाना देण्यास तातडीने सुरूवात करू अशी घोषणा केली होती. त्यानंतर सौदीचे संस्कृती आणि सूचना मंत्री अव्वाद अल अव्वाद यांनी बंदी हटवल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असं म्हटलं.

१९७० मध्ये सौदीत काही चित्रपटगृह होते, पण त्यावेळी इस्लामी कट्टरपंथींच्या दबावामुळे देशभरात चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी चित्रपटांमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख बिघडली जाते असा आरोप कट्टरपंथीयांनी केला आणि याच आधारे त्यांनी चित्रपटगृहांवर बंदी घातली होती.