आर्थिक आघाडीवर वाईट बातमी आहे. देशाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता.

सरकारने शुक्रवारी संध्याकाळी आकडे जाहीर केले. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली आहे. विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी वाढत आहे. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे.

काय म्हणाल्या निर्मला सीतारमन</strong>
विकासाचा वेग कमी झालाय पण मंदीचा कुठलाही धोका नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बुधवारी राज्यसभेत म्हणाल्या. “आर्थिक विकासाचा वेग धीमा झालाय पण मंदीची स्थिती नाही” असे सीतारमन यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक नाहीय असा त्यांचा सूर होता.

देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असताना त्यांनी, मोदींच्या पहिल्या टर्मची काँग्रेसप्रणीत संपुआ दोनच्या २००९ ते २०१४ मधील कारभाराबरोबर तुलना केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई कमी आणि विकासाचा वेग जास्त असल्याचा सीतारमन यांनी दावा केला. “२००९ ते १४ या काळात १८९.५ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक आली तेच भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात २८३.९ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली” असे सीतारमन यांनी सांगितले.