मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत सात महिन्याच्या कालावधीत देशात ३९.३६ लाख नवीन रोजगार निर्मिती झाल्याचे कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या (ईपीएफओ) रोजगार आकडेवारीनुसार समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये ६.१३ लाख नवीन रोजगाराची संधी मिळाली. फेब्रुवारीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. फेब्रुवारीत ५.८९ लाख नवीन रोजगार निर्माण झाले होते. यातील अर्ध्याहून अधिक नोकऱ्या या विशेष सेवा प्रकारात सर्वच वयोगटात निर्माण झाल्या आहेत. ज्या क्षेत्रात रोजगार निर्मिती झाली त्यामध्ये इलेक्ट्रिक, मेकॅनिक आणि सर्वसाधारण अभियांत्रिकी उत्पादनांचा समावेश आहे.

त्यानंतर बांधकाम आणि निर्मिती उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संस्था आणि कापड व्यवसायाचा समावेश आहे. आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते की, संघटित क्षेत्रात रोजगाराची जी संधी निर्माण झाली आहे. यामध्ये अर्ध्याहून अधिक रोजगार हे महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये निर्माण झाले आहेत. मात्र, काही तज्ज्ञांनी आकडेवारीच्या आधारावर रोजगार निर्मितीवर शंका व्यक्त केली आहे. या आकडेवारीनुसार रोजगार निर्मितीचे वास्तव चित्र स्पष्ट होत नाही. कारण यामध्ये कर्मचाऱ्यांकडून नोकरीतील बदलांचाही समावेश आहे, असे या तज्ज्ञांनी म्हटले.

गेल्या काही महिन्यातील ही आकडेवारी तात्पुरती असल्याचे ईपीएफओने ही आकडेवारी जारी करताना म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या नोंदी ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याचेही ईपीएफओने स्पष्ट केले आहे.