28 February 2021

News Flash

बायडेन इन अ‍ॅक्शन! पहिल्याच दिवशी १७ अध्यादेश; करोना, पर्यावरण, मुस्लीम, WHO संदर्भातील ट्रम्प यांचे ‘ते’ निर्णय रद्द

सर्वसामान्यांबरोबरच बायडेन यांनी भारतीय विद्यार्थ्यांनाही दिला दिलासा

(फोटो सौजन्य सीएनएनवरुन साभार)

अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेतील या सत्तांतराची प्रतीक्षा अमेरिकेबाहेरीलही कित्येकांना होती. ‘आजचा दिवस अमेरिकेसाठी आणि लोकशाहीसाठी अमूल्य आहे’ असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. या शपथविधीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय रक्क करण्यास सुरुवात केलीय. बायडेन यांनी पहिल्या दिवशी संध्याकाळी ओव्हल येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात हजेरी लावत १७ अध्यादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यापैकी जवळजवळ सर्वच निर्णय हे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय असून हे रद्द करण्यात आले आहेत.

नक्की वाचा >> जाणून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो?; इतर कोणत्या सुविधा त्यांना दिल्या जातात?

बायडेन यांनी वातावरण बदलाशी लढण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा करत या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे.  सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार असून आधी हे आम्ही कधीही केलेलं नाही, असं बायडेन यांचं म्हणणं होतं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही या करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले इतरही काही निर्णय रद्द केलेत. या निर्णयांची यादी खालील प्रमाणे…

> करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी

> सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत देण्यासंदर्भातील घोषणा

> पॅरिस हवामानबदल करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी

> वर्णद्वेष संपवण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय

> अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द केला. या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला

> जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आलाय.

> ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवण्यात आली

> विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

भाषणामध्येच दिली होती कल्पना

बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचाराबरोबरच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात या निर्णयासंदर्भातील कल्पना दिली होती. करोनामुळे ४ लाख अमेरिकींचा झालेला मृत्यू, लाखोंवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, उद्योगांची झालेली वाताहत, अमेरिकेमध्ये कधीही नव्हता इतका उफाळलेला वंशभेद आणि वर्णभेद अशी निराशाजनक, भीतिदायक परिस्थिती बायडेन-हॅरिस यांच्या आधीच्या प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर आश्वासक फुंकर घालण्याचा प्रयत्न बायडेन यांनी त्यांच्या संयत परंतु निर्धारपूर्वक भाषणातून केला. अमेरिकेने यापूर्वीही संकटे पाहिली. पण कित्येक संकटे एकाच काळात आलेली नव्हती. अशा वेळी ऐक्य हेच आपले प्रभावी शस्त्र बनू शकते, असे बायडेन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 11:27 am

Web Title: in sweeping day 1 action biden rolls back trump policies on wall climate health muslims scsg 91
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प पायउतार होताच चीनने दिला झटका; २८ जणांविरुद्ध घेतला मोठा निर्णय
2 “लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टीकणार नाही, आम्हाला…”; ७२ हजार लोकसंख्या असणाऱ्या देशाचं मोदींना पत्र
3 बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले…
Just Now!
X