करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या अनेक बातम्या कानावर येत आहेत. पण अशातच तेलंगणाच्या एका डॉक्टरनी माणुसकीचं उदाहरण समोर ठेवलं आहे. तेलंगणामध्ये रविवारी डॉक्टर श्रीराम यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून एका करोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. करोनाचा संसर्ग होईल या भीतीने ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने नकार दिल्यानंतर त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवण्याचा निर्णय घेतला.

रविवारी, १२ जुलै रोजी एका ४५ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचा पेडापल्ली जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रशासनाकडून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी एक ट्रॅक्टर पाठवण्यात आला. पण ट्रॅक्टर चालकाने करोनाची लागण होईल या भीतीने ट्रॅक्टर चालवण्यास नकार दिला. सर्व खबरदारी घेतली जाईल असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही चालकाने नकार दिला. ही बाब पेडापल्ली जिल्ह्यात कोविडचा प्रसार रोखणाण्यासाठी पाळत ठेवणारे अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रीराम यांना समजली. त्यांनी ट्रॅक्टर चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो तयार झाला नाही. अखेर, डॉक्टर श्रीराम यांनीच पीपीई किट घातला आणि स्वतः ट्रॅक्टर चालवून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पोहोचवला. “आधीच सहा तासांहून जास्त वेळ मृतदेह पडून होता. नातलग शांतपणे वाट बघत होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही इतका वेळ मृतदेह तिथेच पडून असल्याचं वाइट वात होतं. मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया डॉक्टर श्रीराम यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

आणखी वाचा- दुर्दैवी! करोनाच्या लढाईत झोकून काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा संसर्ग झाल्याने मृत्यू

पाहा व्हिडिओ :-


दरम्यान, डॉक्टर पी. श्रीराम यांचा हा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.