जर इराणनं अणूबाँब बनवला तर आम्ही पण बनवू अशी धमकी इराणचा कट्टर शत्रू असलेल्या सौदी अरेबियानं दिली आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही धमकी दिली आहे. इराण व सौदी अरेबिया यांच्यातून विस्तव जात नाही, आणि एकमेकांना धमकावण्याचे प्रकार वारंवार सुरू असतात. सौदी अरेबिया व इराणमध्ये ऐतिहासिक वैरत्व असून दोन्ही देश समोरासमोर उभे ठाकल्यास मध्यपूर्वेतील शांतता धोक्यात येऊ शकते.

“अणूबाँब बनवण्याची सौदी अरेबियाची अजिबात इच्छा नाही. पण जर का इराणनं अणू बाँब विकसित केला तर आम्ही पण लवकरात लवकर अणूबाँब बनवू यात काही संशय नाही,” सलमान यांनी सीबीएस या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा ट्रेलर प्रसारीत करण्यात आला असून संपूर्ण मुलाखत रविवारी दाखवण्यात येणार आहे.

मध्यपूर्वेवर कुणाचं वर्चस्व असावं यावरूनही सौदी अरेबिया व इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. सलमान यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला असून तेलावरचं अवलंबित्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच आण्विकदृष्ट्या सज्ज असणंही त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे.

सौदी अरेबियाच्या पहिल्या दोन अणूभट्ट्यांसाठी अमेरिका, दक्षिण कोरिया, रशिया, फ्रान्स व चीन यांनी तयारी दर्शवली असून अब्जावधी डॉलर्सच्या या करारासाठी या देशांमध्ये चुरस आहे. शांततापूर्ण मार्गासाठीच अणू कार्यक्रम हाती घेत असल्याचे या देशाने आधी जाहीर केले होते. अर्थात, अणूउर्जेच्या कार्यक्रमाबरोबरच आण्विक शस्त्रास्त्रांचा विकासही करायचाय का याबाबत अद्यापतरी सौदी अरेबियानं मौन बाळगलं होतं.

अधिकृत सरकारी धोरणानुसार अणू कार्यक्रम शांततामय मार्गासाठीच असेल असे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या मर्यादेत राहून हा कार्यक्रम राबवण्याचे सध्याचे सौदी अरेबियाचे अधिकृत धोरण आहे. अणूउर्जेसाठी संपन्न केलेले युरेनियम पाच टक्के शुद्ध करावे लागते, परंतु हीच प्रक्रिया पुढे नेत अण्वस्त्रांसाठी लागणारं युरेनियमही तयार करता येतं. इराण देशांतर्गत हा कार्यक्रम राबवत असून संपूर्ण जगासाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच इराणवर अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले होते. आता मात्र, इराणनं अण्वस्त्र बनवली तर आम्हीही बनवू असा पवित्रा सौदी अरेबियानं घेतल्याचं दिसत असून यामुळे मध्यपूर्वेतील वातावरण बिघडण्याची चिन्हे आहेत.