पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर चलनात दाखल झालेल्या नव्या २ हजार रुपयांच्या बनावट नोटा ५३ दिवसांतच बाजारात दाखल झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील (एनसीआरबी) अधिकृत माहितीतून समोर आले आहे.

एनसीआरबीच्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, गेल्या वर्षी २ हजार रुपयांच्या २,२७२ इतक्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, २ हजार रुपयांची आणि पाचशे रुपयांची नवी नोट ८ नोव्हेंबर नंतरच चलनात दाखल झाली होती. त्यामुळे ८ नोव्हेंबरनंतर ३१ डिसेंबरपर्यंत ५३ दिवसांतच पोलिस आणि इतर सरकारी संस्थांना या बनावट आढळून आल्या होत्या. याच काळात संपूर्ण देशातील लोक नव्या २ हजार रुपयांच्या नोटेच्या प्रतिक्षेत होते.

या २ हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा गुजरातमध्ये (१३००) सापडल्या आहेत. त्यानंतर पंजाब (५४८), कर्नाटक (२५४), तेलंगणा (११४), महाराष्ट्र (२७), मध्य प्रदेश (८), राजस्थान (६) आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरयाणा (३) तर जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी २ बनावट नोटा आढळून आल्या. तसेच मणिपूर आणि ओडिशामध्ये दोन हजार रुपयांची प्रत्येकी १ नोट आढळून आली होती.

दरम्यान, तब्बल २ लाख ८१ हजार ८३९ इतक्या विविध किंमतीच्या बनावट चलनी नोटा देशातील विविध भागातून आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी, टेरर फंडिंग रोखण्यासाठी तसेच बनावट चलनाचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी हा नोटाबंदीचा निर्णय़ घेतल्याचे मोदींनी सांगितले होते.