भारतीय वायूसेनेने मंगळवारी पीओकेत घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारताच्या या आक्रमकतेचा पाकिस्तानी सरकारला धक्का तर बसलाच पण यामुळे पाकिस्तानी शेअर बाजारात मोठा हल्लकल्लोळ माजला आहे. मंगळवारी कराची स्टॉक एक्सचेंजचा केसई-१०० इंडेक्स ७८५.१२ अंश म्हणजे १.९८ टक्क्यांनी कोसळून तो ३८,८२१.६७ अंशावर बंद झाला. शेअर बाजार कोसळण्याचे हे सत्र बुधवारी सकाळीही पाहायला मिळाला. बुधवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर केसई-१०० इंडेक्समध्ये २०० हून अधिक अंशाची घसरण दिसून आली होती. आधीच पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. त्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.

भारतीय बाजार सावरला..
मंगळवारी भारतीय शेअर बाजारातही सुरूवातीला घसरण दिसून आली होती. सकाळी एअर स्ट्राइकचे वृत्त येताच सेन्सेक्स २३७.६३ अंश (०.६६%) आणि निफ्टी १०४.८० अंशांनी (०.९६%) घसरुन क्रमश: ३५,९७५.७५ आणि १०,७७५.३० वर सुरु झाला होता. सेन्सेक्स इंट्राडेमध्ये ३५,७१४.१६ च्या निचांकी स्तरावर गेला होता. पण २६० अंशाच्या रिकव्हरीसह ३५,९७३.७१ वर बंद झाला. निफ्टीही ४५ अंशांच्या घसरणीसह १०,८३५.३० वर आला. जो दिवसाच्या १०,७२९.३० च्या निचांकी स्तरापेक्षा १०६ अंशाच्या वर होते. मात्र, बुधवारी सेन्सेक्स १६५.१२ अंश (०.४६%) आणि निफ्टी ४५.९० अंश (०.४२%) मजबूत होऊ क्रमश: ३६,१३८.८३ आणि १०,८८१.२० वर सुरू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वक्तव्यातून देशाच्या ताकदीचा दाखला दिल्यानंतर भारतीय शेअर बाजार उसळीने सुरू झाला. आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी कराची स्टॉक एक्स्चेंजमधून पैसे काढण्यास सुरूवात केली आहे. सकाळी ११.१५ वाजता केएसई-१०० मध्ये ३८६.९४ म्हणजे १ टक्क्यांची घसरण झाली होती.