हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळा देश हादरला आहे. या प्रकरणी योगी सरकार गप्प का असा प्रश्न विरोधक सातत्याने उपस्थित करत आहेत. दरम्यान या प्रकरणी योगी सरकारने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  एवढंच नाही तर हाथरस प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीला मारहाणही झाली. तिची जीभही कापण्यात आली. या सगळ्या घटनेनंतर या तरुणीला दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर या मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार परस्पर केले असा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान हाथरस या ठिकाणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांना कुणालाही भेटू दिलं गेलेलं नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही गुरुवारी रोखण्यात आलं. राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप आहे. या घटनेचेही पडसाद देशभरात पाहण्यास मिळाले. अनेक ठिकाणी मोदी सरकारचा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतर्फे निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली.

भाजपाच्या फायर ब्रांड नेत्या उमा भारती यांनीही योगी सरकारला या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटू द्यावं अशी विनंती केली आहे. तसंच हाथरस प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाल्याचंही मत व्यक्त केलं. आता या प्रकरणी पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, निरीक्षक यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.