25 March 2019

News Flash

इशरत जहाँ प्रकरणी मोदींचीही झाली होती चौकशी, माजी आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

सीबीआयने केलेले आरोप हे संशयास्पद आहेत.

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही चौकशी करण्यात आली होती, असा दावा माजी आयपीएस अधिकारी आणि या प्रकरणातील आरोपी डी जी वंजारा यांनी केला आहे.

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही चौकशी करण्यात आली होती, असा दावा माजी आयपीएस अधिकारी आणि या प्रकरणातील आरोपी डी जी वंजारा यांनी केला आहे. आरोपातून मुक्त करण्यासाठी वंजारा यांनी मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आपल्या अर्जात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांची चौकशी करण्यात आली होती, असे म्हटले आहे. परंतु, या प्रकरणात अशी कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही. त्यावरून याप्रकरणात उपलब्ध नोंदी पाहता हे दुसरे काही नसून फक्त एक बनाव आहे, असे त्यांनी आपल्या अर्जांत म्हटले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना तपास अधिकाऱ्यांनी बोलावून त्यांची चौकशी केली होती, हे तथ्य तसेच राहील. दरम्यान, या प्रकरणात अशा काही नोंद ठेवण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांना या प्रकरणात आरोपी करायचे असा तत्कालीन तपास पथकाचा हेतू होता, असा उल्लेख वंजारा यांनी आपल्या अर्जात केला आहे.

वंजारा यांनी स्वत:ला दोषमुक्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमुर्ती जे के पांड्या यांनी सीबीआयला नोटीस जारी करून २८ मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. गुजरातचे माजी प्रभारी महानिदेशक पी पी पांडे यांच्या आरोपातून दोषमुक्त केले आहे. वंजारा यांनी याच आधारावर आपल्याला दोषमुक्त करावे अशी विनंती केली आहे. सीबीआयने केलेले आरोप हे संशयास्पद आहेत. प्राथमिकदृष्टया ते सिद्ध करण्यासाठी कोणताच पुरावा नाही. त्यांच्या चेंबरमध्ये रचण्यात आलेल्या कटानुसार ही चकमक झाली, असा आरोपपत्रात दावा करण्यात आल्याचे वंजारा यांनी म्हटले आहे.

 

काय आहे इशरत जहाँ प्रकरण
१५ जून २००४ रोजी अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी गुजरात पोलिसांनी केलेल्या चकमकीत १९ वर्षांची इशरत आणि तिच्याबरोबर असलेल्या ३ तरुणांना ठार मारण्यात आले होते. इशरत ही लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेची सदस्य होती असा दावा पोलिसांनी केला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची हत्या करण्यासाठी तिला पाठवण्यात आल्याच्या संशयावरून ही चकमक करण्यात आली होती. या चकमकीत इशरतबरोबर तिचा साथीदार जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्ले हाही ठार झाला होता. सर्वात आधी गुजरातच्या मेट्रोपोलिटन न्यायालयाने ही चकमक बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आधी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी आणि त्यानंतर सीबीआयाने या प्रकरणी तपास केला. इशरत आणि लष्कर-ए-तोयबाचा काहीही संबंध या दोन्ही तपास संस्थाना आढळला नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी स्थापन करण्यात आली. या समितीनेही इशरत निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला होता.

First Published on March 14, 2018 8:35 am

Web Title: in the ishrat jahan case narendra modi was questioned the former ips officer vanjara claimed