देशभरात करोनाचे ३३९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये समोर आलेली ही संख्या आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये करोनाची बाधा होऊन १०३ जणांचा देशभरात मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत देशात करोनाची बाधा होऊन १८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सापडणाऱ्या करोना रुग्णांपैकी प्रत्येक ३ रुग्णांमधला एक रुग्ण बरा होतो आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं. देशभरात असे २९ जिल्हे जिथे मागील २१ दिवसात एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ४२ जिल्हे असे आहेत जिथे २८ दिवसात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तर ४६ जिल्हे असे आहेत ज्यामध्ये मागील सात दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असंही अग्रवाल यांनी सांगितलं.