काश्मीरमध्ये किमान रमजानच्या पवित्र महिन्यांत तरी दहशतवादी कारवाया थांबतील अशी भारताला आशा होती. मात्र, असे झाले नाही उलट रमजानच्या महिन्यांतील ३० दिवसांत ५० दहशतवादी हल्ले आणि २० ग्रेनेड हल्ले झाले आहेत. त्याचबरोबर दगडफेकीच्या ६० घटनाही घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये ४१ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी या हिंसाचाराची आकडेवारी प्रसिद्ध केली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या सैन्याला रमजानच्या महिन्यांत दहशतवाद्यांविरोधातील कारवाई रोखण्याचे आदेश दिले होते. १६ मे रोजी राजनाथ यांनी हे आदेश दिले होते. याच दिवसापासून रमजानला सुरुवात झाली होती. काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी सर्वप्रथम या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी म्हटले होते की, या निर्णयामुळे दररोज होणाऱ्या हिंसाचाराला आळा बसेल, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच राहिली. उलट दहशतवादी हल्ल्यामध्ये वाढ होऊन यामध्ये सर्वसामान्य जनतेसह भारतीय जवानही शहीद झाले. दरम्यान, १६ जून रोजी ईद झाल्यानंतर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल ते १७ मे पर्यंत काश्मीरमध्ये १८ दहशतवादी हल्ले झाले. त्यानंतर रमजानच्या महिन्यांमुळे कारवाईत सूट दिल्याने १७ मे ते १७ जून या काळात हल्ल्यांचा हा आकडा ५०वर पोहोचला. रमजानदरम्यान आपले ९ सुरक्षा रक्षक मारले गेले. ४ लष्कराचे जवान शहीद झाले. गेल्या दोन दिवसांत २ सामान्य नागरिक मारले गेले. शनिवारी शिराज अहमद नामक व्यक्तीला मारण्यात आले. तर ग्रेनेड हल्ल्यामध्ये ६२ नागरिक आणि २९ जवान जखमी झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही संख्या दोन वर्षातील सर्वाधिक संख्या आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रमजानच्या दरम्यान दगडफेकीच्या ६० घटना घडल्या आहेत.

दरम्यान, दहशतवाद्यांनी रायजिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांना ठार केले. त्यांचे दोन खासगी सुरक्षारक्षकही या हल्ल्यामध्ये मारले गेले. लष्कराचा जवान औरंगजेब खान याचे अपहरण करुन ठार मारण्यात आले. मारण्यासाठी दहशतवाद्यांनी त्याला मारल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल केला. ओरंगजेब दहशतवाद्यांना मारण्याच्या अनेक कारवायांमध्ये समाविष्ट होते. औरंगजेबसह तीन नागरिकांनाही दहशतवाद्यांनी मारले होते. औरंगजेब ईदसाठी आपल्या घरी निघाले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान, या कारवायांमध्ये २४ दहशतवादी देखील मारले गेले होते. यामध्ये सर्वाधिक कुपवाडा जिल्ह्यांतील कारवाईत मारले गेले. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद आणि अल बद्र या दहशतवादी संघटनांचे ते दहशतवादी होते. उत्तर काश्मीरच्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पाक व्याप्त काश्मीरमधून पाठवण्यात आलेले हे दहशतवादी कठोर प्रशिक्षण घेऊन आले होते.