गेल्या साठ वर्षांत जगात मान्यता पावलेला व घरोघरी पोहोचलेला जग बदलून टाकणारा एकही महत्त्वाचा शोध लागलेला नाही, अशी खंत माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ व इन्फोसिसच्या संस्थांपकांपैकी एक असलेले एन.आर.नारायणमूर्ती यांनी व्यक्त केली.
जवाहरलाल नेहरू यांच्याशिवाय कुठल्याही पंतप्रधानाने देशातील संशोधनाकडे लक्ष दिले नाही, अशी खंत व्यक्त करून मूर्ती यांनी भारतीय विज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात सांगितले, की आपल्या युवकांनी परिणामकारक संशोधन केलेले नाही जे पाश्चिमात्य विद्यापीठात झाले. नेहरू यांनी १९६२ मध्ये अमेरिकेला भेट दिली, तेव्हा तेथे पीएच.डी. संपवत आलेल्या मुलांना भारतात येऊन देशासाठी काहीतरी करण्याचे सुचवले होते. खेडय़ातील गरिबात गरीब मुलापर्यंत शिक्षण, आरोग्य, पोषण, निवारा या सुविधा पोहोचाव्यात यासाठी ते आवश्यक असल्याचे सांगितले त्यामुळे अणुऊर्जा व अवकाश कार्यक्रमात आपण यशस्वी झालो, पण साठच्या दशकातील जादू आता राहिली नाही. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्त्या व इतर माध्यमातून अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, संधी निर्माण कराव्या लागतील. मोटारी, विद्युत दिवा, रेडिओ, दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट, वायफाय, एमआरआय लेसर, रोबोट व इतर अनेक यंत्रांचे शोध पाश्चिमात्य विद्यापीठांमुळे लागले आहेत. त्या काळात भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स) व भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी गेल्या साठ वर्षांत जग व समाजाच्या कल्याणासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. आपल्याकडे असा एकही महत्त्वाचा शोध लागला नाही जो जगातील घराघरात चर्चिला जाईल.