तीन वर्षांपूर्वी २०१७ साली डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आलं होतं. भारताने त्यावेळी चीनची दादागिरी खपवून न घेता कठोर भूमिका घेतली, त्यामुळे चीनला मागे हटावं लागलं. पण त्यानंतर चीनच्या रणनितीक उद्दिष्टांमध्ये मोठा बदल झाला. मागच्या तीन वर्षात चीनने भारताजवळच्या सीमाभागांमध्ये एअर बेस, एअर डिफेन्स सिस्टिम आणि हेलिपॅडची संख्या दुप्पट केली आहे.

‘स्टार्टफॉर’च्या अजून प्रसिद्ध न झालेल्या अहवालातून चीनच्या या विस्तारवादी धोरणाचा खुलासा झाला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. ‘स्टार्टफॉर’ ही एक जागतिक गुप्तचर संस्था आहे. उपग्रह छायाचित्रांवरुन चीनच्या लष्करी इन्फ्रास्ट्रक्चरचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. चीनच्या या लष्करी तळांचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

“लडाख सीमावाद सुरु होण्याआधी चीनकडून भारतीय सीमांजवळ लष्करी तळांची उभारणी करण्यात आली. सीमेवरील सध्याचा तणाव म्हणजे सीमा भागांवर नियंत्रण मिळवण्याच्या चीनच्या मोठया रणनितीचा भाग आहे” असे सीम टॅक म्हणाले. ते स्टार्टफॉरचे वरिष्ठ जागतिक विश्लेषक आहेत.

लष्करी तळ उभारणीचे अजून बरेच काम पूर्ण व्हायचे आहे. “विस्तार आणि लष्करी तळांच्या उभारणींचे काम सुरु आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर चिनी सैन्याच्या ज्या हालचाली दिसत आहेत, ती त्यांच्या दीर्घकालीन उद्देशाची सुरुवात आहे” असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

१३ तास चालली मॅरेथॉन बैठक
लडाख सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये काल सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली. तब्बल १३ तासाच्या मॅरेथॉन चर्चेनंतर ही बैठक संपली. सकाळी सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय प्रतिनिधी लवकरच आपल्या वरिष्ठांना नेमकी काय चर्चा झाली, त्याची माहिती देतील.