उत्तर प्रदेशमध्ये एन्काऊंटरचे प्रमाण वाढल्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिंसाविषयी भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय आता सीतापूर येथे पाहायला मिळत आहे. सीतापूरमध्ये पोलीस अधिक्षकांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेक गुन्हेगार हे एक तर जिल्हा सोडून पलायन करत आहेत किंवा स्वत:ला वाचवण्यासाठी ठाण्यातच रात्रीचा मुक्काम करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात अशीच प्रकरणे समोर येत आहेत. काही प्रकरणात गुन्हेगार स्वत: शरण येत आहेत किंवा जामीन मिळाल्यानंतरही तुरूंग सोडण्यास तयार नाहीत.

लहरपूरचे पोलीस अधिकारी अखंडप्रताप सिंह यांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे गुन्हेगारांनी पोलिसांसमोर गुडघे टेकले आहेत. अनेकांनी एन्काऊंटरपासून वाचण्यासाठी पोलिसांकडे शरणागती पत्करी आहे. सीतापूरचे पोलीस अधिक्षक आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, सुमारे एक डझनहून अधिक गुन्हेगार ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, ते सर्व रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात मुक्काम करतात आणि सकाळी आपापल्या घरी किंवा कामावर निघून जातात. या सर्वांनी पुढे गुन्हे न करण्याची शपथ घेतली आहे. तपासकामात ते सहकार्यही करत आहेत. त्यांच्यातील बदलाचे पोलीस विभागाकडून स्वागत केले जात आहे.

दरम्यान, राज्यातील पोलिसांनी आक्रमक धोरण स्वीकारल्यापासून गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोकळीक दिली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.