अमेरिकी कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक पातळीवर निर्माण झालेली कटुता संपण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने खोब्रागडे यांना सुनावणीपूर्व प्रक्रियेतून वगळण्याचे जवळपास निश्चित केले आहे. ही प्रक्रिया सोमवारी होणार होती. त्यात आता खोब्रागडे यांना हजर राहावे लागणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
   खोब्रागडे यांना अमेरिकेने प्राथमिक सुनावणीच्या आधी होणाऱ्या प्रक्रियांतून सूट दिली नसती तर त्यांना आणखी वैद्यकीय चाचण्या, बोटांचे ठसे देणे अशा अनेक कटकटींना सामोरे जावे लागले असते. देवयानी खोब्रागडे यांची आणखी मानखंडना होऊ नये असे भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता ख्रिसमस तोंडावर आल्याने सरकारी कार्यालये बंद राहणार असून, पुढील निर्णय वेगाने घडवून आणण्यात भारत सरकारची कसोटी लागणार आहे.
  दरम्यान, खोब्रागडे यांची न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या स्थायीस्वरूपी मिशनमध्ये बदली करण्यात आली असून त्यांना राजनैतिक अधिकाऱ्याचे सर्व विशेषाधिकार बहाल करण्यात यावे अशी विनंती भारताने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यान्ंना केली आहे.