उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवातून काँग्रेसला फक्त समाधान मिळू शकते. त्या व्यतिरिक्त काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही. कारण काँग्रेसची स्थिती त्याहूनही वाईट आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. काँग्रेसने गोरखपूरमधून सुरहिता चटर्जी करीम आणि फुलपूरमधून मनीष मिश्रा यांना उमेदवारी दिली होती.

मनिष मिश्रा उत्तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांचे वडिल आणि माजी आयएएस अधिकारी जेएस. मिश्रा काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून त्या भागामध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहेत. तरीही मनिष मिश्रा यांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. सुरहिता चटर्जी सुद्धा लोकप्रिय चेहऱ्यांपैकी असून त्यांनी २०१२ साली गोरखपूरमधून महापौरपदाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना एक लाख मते मिळाली होती.

शहरामध्ये त्यांच नर्सिंग होम आहे. काँग्रेसची उत्तर प्रदेशातील सूत्रे संभाळणारे राज बब्बर यांनी सपा आणि भाजपाच्या आधी उमेदवारांची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाने उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चक्रावून गेले होते. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याआधी त्यांनी एकदाही स्थानिक नेत्यांशी चर्चा केली नाही असा आरोप केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वट करुन भाजपावर टीका केली. त्याचवेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसचे नवनिर्माण करु असे म्हटले आहे. पण हे एका रात्रीत होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.