21 September 2020

News Flash

उत्तर प्रदेश : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक प्रकरणं गोहत्येसंदर्भातील

एनएसएची सर्वाधिक प्रकरणं ही बरेली जिल्ह्यातील

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये गोहत्या प्रकरणातील एका आरोपीवर ६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे उत्तर प्रदेशमध्यो गोहत्या प्रकरणामध्ये एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संख्या वाढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणं ही गोहत्येशी संबंधित आहे. साडे आठ महिन्यांमध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये १३९ जणांविरोधात एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रकरण ही गोहत्येशी संबंधित आहेत.

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी १९ ऑगस्टपर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांनी एनएसए अंतर्गत १३९ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ७६ गुन्हे हे गोहत्या प्रकरणाशी संबंधित आहेत. सर्वाधिक प्रकरणं ही बरेली जिल्ह्यातील आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत बरेली पोलिसांच्या हद्दीमध्ये एनएसएअंतर्गत ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांपैकी सहा प्रकरणांमध्ये एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर गंभीर गुन्ह्यांप्रकरणी ३७ आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी २० जणांविरोधात एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात आंदोलन करणाऱ्या १३ जणांना या कायद्यानुसार अटक करण्यात आली. एनएसए कायद्यानुसार पोलिसांना एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरु शकतो असं वाटलं तर ते एखाद्या आरोपीला कोणताही आरोप सिद्ध होण्यापूर्वीच १२ महिन्यांपर्यंत तुरुंगामध्ये ठेऊ शकतात. अवस्थी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबद्दल स्पष्टीकरणही दिलं आहे. “सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशा प्रकरणांमध्ये एनएसएअंतर्गत कारवाई करावी असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. गुन्हेगारांमध्ये कायद्याबद्दल भीती निर्माण व्हावी आणि जनतेला सुरक्षेसंदर्भातील यंत्रणेवरील विश्वास वाढावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं अवस्थी म्हणाले. एनएसएशिवाय याच वर्षी २६ ऑगस्टपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या निवारण अधिनियमअंतर्गत एक हजार ७१६ गुन्हे दाखल झाले असून जवळवजळ चार हजार जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींविरोधात पुरावे न मिळाल्याचे ३२ प्रकरणांमध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी दोन हजार ३८४ जणांविरोधात उत्तर प्रदेश गँगस्टर्स कायदा आणि एक हजार ७४२ जणांविरोधात गुंडगिरी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 8:49 am

Web Title: in uttar pradesh more than half of nsa arrests this year were for cow slaughter scsg 91
Next Stories
1 कंगनाची आई भाजपात, मोदी-अमित शाह यांचे मानले आभार
2 करोनाचा प्रादुर्भाव संपला; रॅलीदरम्यान भाजपा नेत्याचा दावा
3 सीमेवर तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर एकमत; सैनिक हटवण्यावरही चर्चा
Just Now!
X