गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. कलाकारांना हिंसक धमक्या देणे किंवा त्यांना मारण्यासाठी इनाम जाहीर करणे, या गोष्टींना लोकशाहीत थारा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी लोकांच्या भावनांचाही आदर राखला जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते शनिवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात बोलत होते. यावेळी त्यांनी कोणत्याही एका चित्रपटाचे नाव न घेता व्यापक संदर्भ देत आपले विचार मांडले. त्यांनी म्हटले की, सध्या काही चित्रपटांवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटांमुळे विशिष्ट धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जातात, असा आक्षेप घेत त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान काही जणांनी मर्यादांचे उल्लंघन करत संबंधित चित्रपटातील कलाकारांवर हल्ला करण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. बक्षिस देण्यासाठी या लोकांकडे खरंच इतका पैसा आहे का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. प्रत्येकजण एक कोटींचे इनाम जाहीर करतो. एक कोटी रूपये देणे त्यांच्यासाठी खरंच इतके सोपे आहे का?, असा सवाल नायडू यांनी विचारला.

मात्र, अशा गोष्टींना लोकशाहीत थारा नाही. तुम्हाला लोकशाही मार्गाने विरोध करायचा हक्क आहे, त्यासाठी तुम्ही संबंधित यंत्रणांकडे दाद मागा. परंतु, तुम्ही एखाद्याला शारीरिक इजा पोहचवणे किंवा हिंसक धमक्या देणे, अशी कृत्ये करता कामा नये. कोणत्याही प्रकारे नियम आणि कायद्यांची पायमल्ली होऊन देऊ नका, असे त्यांनी सांगितले. मी कोणत्याही विशिष्ट चित्रपटाबद्दल बोलत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, यावेळी नायडू यांनी यापूर्वी बंदी टाकण्यात आलेल्या ‘हराम हवा’, ‘किस्सा कुर्सी का’, ‘आंधी’ या चित्रपटांचा भाषणात उल्लेख केला.

त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या या सूचक वक्तव्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाला होणाऱ्या विरोधाची धार कमी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही या चित्रपटाचे प्रदर्शन होऊन देणार नसल्याचे येथील राजकीय पुढाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांना देण्यात आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सगळ्याला भाजपचा मूक पाठिंबा असल्याची चर्चाही आहे. आतापर्यंत एकाही भाजप नेत्याने यासंदर्भात भाष्य केलेले नाही. त्यामुळे व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चित्रपटाला विरोध करताना कायदा हातात घेणे चुकीचेच आहे. मात्र, लोकांच्या भावना दुखावण्याचा हक्क कोणालाही नाही, असे सूचक विधान नायडू यांनी केले.