उत्तराखंडातील नद्यांच्या किनाऱ्यांवर निवासी घरे आणि व्यापारी संकुलांच्या बांधकामांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्यातील पूरग्रस्त भागाचा विकास आणि तेथे नियोजन करण्यासाठी वैधानिक मंडळ स्थापन करण्याचीही घोषणा बहुगुणा यांनी केली.
जून महिन्यात आलेल्या भीषण आपत्तीच्या पाश्र्वभूमीवर आगामी दशकांतील आव्हानांना सामोरे जाणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात पुनर्वसन आणि पुनर्बाधणी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असेल, असे बहुगुणा यांनी सांगितले. या आपत्तीचा आढावा घेण्याचे काम बाकी असून तीन हजार लोकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. आपद्ग्रस्त भागातील चिखलमातीचा ढिगारा काढण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर शिल्लक असल्याने मृतांचा निश्चित आकडा सांगण्याचे बहुगुणा यांनी टाळले.