केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांची छत्तीसगढ कॉंग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात निवडणुका येऊ घातल्या असल्यामुळे व मागील आठवड्यात छत्तीसगढ कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल यांची नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली.
माजी राज्यमंत्री भूपेश वाघेला यांची छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस समितीच्या कार्यक्रम समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी या निवडी केल्याचे कॉंग्रेसचे सचिव जनार्दन द्विवेदी यांना जाहीर केले. ३० मेला नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पटेल यांच्या व्यतिरिक्त महेंद्र कर्मा व इतर ब-याच पक्ष कार्यकर्त्यांची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली. एकूण २७ जणांची नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात हत्या केली व माजी केंद्रीय मंत्री व्ही. सी. शुक्लांसह ३७ जण हल्ल्यात जखमी झाले.
छत्तीसगढचे माजी प्रदेशाध्यक्ष अठ्ठावन्न वर्षीय महंत या वर्षाच्या शेवटी येऊ घातलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. महंत कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांच्या जवळचे असल्याचे मानले जात आहे. राज्यातील ओबीसी नेता ही ओळख असलेले महंत हे प्रदेशाध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोरबा मतदार संघातून निवडून आलेले महंत कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार असून, वाघेल आदिवासींचे प्रतिनिधी आहेत. राज्याच्या स्थापने पासूनची ही चौथी निवडणुक असणार आहे.     
माजी मुख्यमंत्री अजित जोगी देखील अध्यक्ष पदाचे दावेदार होते. जोगीं यांनी मागिल आठवड्यात पक्षश्रेष्ठींना निवडणुका पार पडेपर्यंत प्रदेशाध्यक्षपद रिक्त ठेवण्यची विनंती केली होती. प्रदेशाध्यक्ष पद रिक्त ठेवल्यास पटेल यांना खरी श्रध्दांजली मिळेल व पक्ष येणारी निवडणुक पटेल यांच्या नावा खाली लढेल असे जोगी यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपले मत मांडले होते.