पाकिस्तान बहुचर्चित कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन  ९ नोव्हेंबरला होणार असून ती शीख भाविकांसाठी खुली केली जाईल, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी सांगितले.

ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात असलेल्या डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे. पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब येथे व्हिसा नसतानाही भेट देण्याची सुविधा शीख भाविकांना उपलब्ध झाली आहे.

कर्तारपूर साहिब या ठिकाणाची स्थापना १५२२ मध्ये गुरू नानक देव यांनी केली होती. पाकिस्तानने त्यांच्या बाजूने कर्तारपूर मार्गिकेचे काम  जवळपास पूर्ण केले असून भारतीय सीमेपासून गुरुद्वारा दरबार  साहिबपर्यंत भाग पाकिस्तानने तयार केला आहे. सीमेपासून पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानकपर्यंतचा भाग भारताने तयार केला आहे.

इम्रानखान यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर्तारपूर प्रकल्प अंतिम टप्प्यात असून  आता जगातील शीख भाविकांना या धार्मिक ठिकाणाचे दरवाजे खुले होणार आहेत.  गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्ताने शीख धर्मस्थळ ९ नोव्हेंबरला खुले केले जाणार आहे. जगातील हा सर्वात मोठा गुरुद्वारा असून त्याला आता भारतासह जगातील शीख भाविक भेट देऊ शकतील.  त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना मिळेल त्यातून देशाला परकीय चलनही मिळणार आहे. शिवाय रोजगार निर्मिती होईल. पाकिस्तानात धार्मिक पर्यटनाला उत्तेजन दिले जात असून याआधी बौद्ध भिख्खूंनी काही ठिकाणांना धार्मिक विधीसाठी भेटी दिल्या होत्या.

१० ऑक्टोबरला पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी शीख धर्मस्थळाकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाची कुठलीही तारीख ठरलेली नसल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला होता.