करोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयावरुन आता सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र काँग्रेसने आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही असे म्हटले आहे. त्यामुळेच संसदेच्या अधिवेशनावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अधिवेशन रद्द करण्यावरुन भाजपाला टोला लगावला आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द होत असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत वल्लभ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “हा करोनापण विचित्रच आहे. नीट तसेच जेईई परीक्षांच्या काळात, बिहार तसेच बंगालमधील निवडणूक प्रचारसभांच्या वेळी आणि मध्य प्रदेशमध्ये निवडून आलेली सरकार पाडताना तो सक्रीय नव्हता. तो केवळ संसदेच्या अधिवेशन काळामध्ये सक्रीय होतो,” असा टोला वल्लभ यांनी लगावला आहे. वल्लभ यांचे हे ट्विट एक हजारहून अधिक जणांनी शेअर केलं असून पाच हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांचाही टोला

शिवसेना नेत्या व अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी),” असं म्हणत ऊर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- खरोखरच… टू मच डेमोक्रसी; ऊर्मिला मातोंडकर यांचा मोदी सरकारवर निशाणा

काय आहे पत्रामध्ये?

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते. “सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली पण करोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले” असे प्रल्हाद जेशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. “करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयामधील महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते.