सिक्कीममधील भारत चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्याची घटना घडली. उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टरमध्ये असेलेल्या भारत चीन सीमेजवळ हा प्रकार घडला. यानंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

चीनी सैनिकांचा असा उद्दामपणा यापूर्वीही दाखवला होता. आज घडलेल्या घटनेत भारताचे आणि चीनचे काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काही बाचबाचीही झाली. परंतु स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला. काही वेळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बाचाबाची सुरू होती. परंतु त्यानंतर ते आपापल्या पोस्टवर परत गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच बऱ्याच कालावधीनंतर अशाप्रकारची घटना घडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. एएनआयनं लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सिक्कीममध्ये अनेकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशाप्रकारचे वाद पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी असे वाद होतात त्यावेळी ठरवण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार दोन्ही देशांचं सैन्य आपापसात अशा समस्यांचं निराकरण करतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

२०१७ मध्येही निर्माण झाला होता तणाव

यापूर्वी २०१७ मध्ये दोन्ही देशांदरम्यान सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी निर्माण झालेला तणाव इतका मोठा होता की भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अनेक दिवस या ठिकाणी कँपिंग केलं होतं. यामध्ये १७ व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंगही सामिल होते. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या मुख्यालयानंही दखल घेतली होती.