गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढाकार घेतला असून मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरात अतिशय सुसज्ज अशी हेलिकॉप्टर्स गस्त घालणार आहेत. या हेलिकॉप्टर्समध्ये अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा असतील तसेच बंदूकधारी कमांडो असतील, याशिवाय निर्मनुष्य हवाई वाहनेही वापरली जाणार आहेत.  दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर व अहमदाबाद या शहरांना ही हेलिकॉप्टर्स दिली जाणार असून टेहळणीची साधने, उच्चशक्ती कॅमेरे, संवेदक व इतर टेहळणी उपकरणे त्यात बसवलेली आहेत. सुरक्षित शहरे प्रकल्प गृहमंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असून त्याअंतर्गत ही हेलिकॉप्टर्स देण्यात येत आहेत.
मंत्रालयाने असे म्हटले आहे की, शहरांमधील गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आकाशातून टेहळणी करणे आवश्यक आहे, त्यामुळे गुन्ह्य़ांना आळा बसू शकेल.
याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, हवाई टेहळणी करताना बलून, निर्मनुष्य हवाई वाहने, हेलिकॉप्टर्स यांचा वापर केला जाणार आहे. त्यात कॅमेरे, संवेदक अशी उपकरणे असतील, जी प्रसंगानुरूप वापरता येतील.
या हवाई वाहनांमधील विविध साधनांनी मिळवलेल्या व्हिडिओ, ऑडिओ व टेक्स्ट अशी माहिती कमांड कंट्रोल सेंटरला दिली जाईल. त्यामुळे प्रतिबंधात्मक व एखादी घटना घडल्यानंतरची कारवाई शक्य होणार आहे.