पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडा विकणे हादेखील रोजगार असल्याचं वक्तव्य केल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं होतं. मात्र सध्या लुधियानातील पन्ना सिंग पकोडेवाला चर्चेत असून त्याला कारणही तसंच आहे. पन्ना सिंग पकोडेवालाने नरेंद्र मोदींचं वक्तव्य फक्त योग्य असल्याचं सिद्ध केलेलं नाही तर अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. ज्यामुळे आयकर विभागाची त्याच्यावर नजर पडली असून वार्षिक उत्पन्नाची माहिती घेतली जात आहे.

आयकर विभागाच्या वेगवेगळ्या टीम सध्या पन्ना सिंग पकोडेवाल्यावर कारवाई करत असून तपास सुरु आहे. मुख्य आयुक्त डी एस चौधरी यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. नुकतंच पन्ना सिंग पकोडेवाल्याने नवं आऊटलेट सुरु केलं असून आयकर विभागाची त्यावरही नजर आहे. सहआयुक्त अपुल जैस्वाल यांना जेव्हा कारवाईसंबंधी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कोणतीही अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र दोन्ही ठिकाणी तपासणी सुरु असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या वार्षिक उत्पन्नाची चुकीची माहिती देण्यात येत असून कर चुकवला जात माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नेमका किती कर चुकवण्यात आला आहे यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नसून रिपोर्ट दाखल झाल्यानंतरच अधिकृत आकडा हाती येईल.

सुत्रांनुसार, अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यासोबत गुरुवारी एका अधिकाऱ्याला कॅश काऊंटरवर बसवत दिवसभरात नेमकी किती विक्री होते याची पाहणी केली. ज्यामुळे दिवसाला नेमकी किती कमाई होत असून, त्याआधारे वार्षिक उत्पन्नाचा अंदाज लावत किती कर जमा केला गेला पाहिजे याची माहिती घेतली गेली.

1952 रोजी पन्ना सिंग यांनी गिल रोडवर छोटंसं पकोडा शॉप सुरु केलं होतं. सध्या हे नाव प्रत्येक घराघरात पोहोचलं असून फक्त पंजाब नाही तर इतर राज्यातही प्रसिद्ध आहे. यासंबंधी पकोडा शॉपचे मालक देव राज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.