नोटाबंदीनंतर ज्या खातेधारकांनी संशयित व्यवहार केले आहेत त्या खातेधारकांची आयकर विभागातर्फे ऑनलाइन चौकशी केली जाणार आहे. आठ नोव्हेंबरनंतर ज्या खातेधारकांनी आपल्या खात्यांमध्ये आपल्या जाहीर उत्पन्नापेक्षा जास्त पैसा टाकला असेल त्यांची ऑनलाइन चौकशी केली जाणार आहे. अशा खातेधारकांना नोटीस दिली जाईल आणि त्यांना आपल्या खात्यांबाबतचे स्पष्टीकरण ऑनलाइन भरावे लागणार आहे. जर आयकर विभागाला दिलेले उत्तर समाधानकारक नसेल तर अशा खातेधारकांची प्रत्यक्ष चौकशी देखील होणार आहे.

प्रत्यक्ष चौकशीमध्ये होणारा त्रास आणि श्रम पाहता ऑनलाइन चौकशी करणे अधिक सुलभ राहिल असा विचार आयकर विभागाने केला आहे. या चौकशीचा मुख्य उद्देश संशयित खातेधारकांच्या उत्पन्नाचा स्रोत शोधणे हा आहे. रोकड जमा करण्याबाबतची माहिती आयकर विभागाच्या इ फायलिंग विंडोवर उपलब्ध आहे. आयकर विभागाने एक युजर गाइडसुद्धा दिले आहे. कॅश ट्रांझॅक्शन २०१६ च्या कंप्लायंस या लिंकचा वापर करुन तुम्ही ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतचे बॅंकेचे व्यवहार पाहू शकता. तुमच्या पॅन नंबरशी जोडलेल्या खात्यांचे व्यवहार यावर उपलब्ध आहेत. पॅन नंबर नसलेल्या खात्यांचाही पर्याय उपलब्ध आहे.

तुमच्या खात्यामध्ये जाहीर उत्पन्नापेक्षा रोकड कशी आली त्याचे स्पष्टीकरण वेबसाइटवर द्यायचे आहे. जर एका खात्यामधून काढून दुसऱ्या खात्यामध्ये जर रोकड भरली असेल तर त्याचा पुरावा देणे अनिवार्य आहे. जर दुसऱ्या व्यक्तीकडून रक्कम घेतली असेल तर त्याचे नाव देणे अनिवार्य आहे. ही रक्कम तुम्ही कशाच्या स्वरुपात स्वीकारली जसे की कर्ज, भेट किंवा देणगी याचा तपशील देणे आवश्यक आहे.

जर या काळात जमा करण्यात आलेली रोख रक्कम ही उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे आढळले आणि स्पष्टीकरण पटले नाही तर त्या खात्यावर शेरा मारण्यात येईल. अशा खातेधारकांना इमेल किंवा एसएमस द्वारे संपर्क साधला जाईल. जर स्पष्टीकरण पटले आणि त्यात कुठलीही संदिग्धता आढळली नाही तर संबंधित प्रकरण बंद केले जाईल आणि त्या व्यक्तीला आयकर विभागात जावे लागणार नाही असे युजर गाईडमध्ये म्हटले आहे. नोटाबंदीनंतर संशयित खाते म्हणून १८ लाख लोकांना आतापर्यंत नोटीस पाठवण्यात आलेली आहे, असे महसूल विभागाचे सचिव हसमुख अधियांनी म्हटले आहे.