News Flash

आयकर विभागाने सहकारी बँकांभोवती आवळला कारवाईचा फास; ‘त्या’ ४५०० खात्यांची चौकशी

ही खाती महाराष्ट्रासह गोवा आणि दमणमधील बँकांतील आहेत.

महाराष्ट्र, गोवा येथील सहकारी बँकांमधील ४५०० खात्यांच्या व्यवहारांची तपासणी आयकर विभाग करत आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशभरात ठिकठिकाणी धाडसत्र सुरू असून, आयकर विभागाने आता नागरी सहकारी बँकांभोवतीचा कारवाईचा फास घट्ट आवळला आहे. मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सहकारी बँकांमध्ये उघडण्यात आलेली खाती अथवा कार्यान्वित झालेल्या बँक खात्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. जवळपास ४५०० बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात आहेत. नोटाबंदीनंतर दीड महिन्यात या खात्यांमध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपात जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये जमा करण्यात आले असून, ही सर्व खाती महाराष्ट्र, गोवा आणि दमणमधील सहकारी बँकांमधील आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नोटाबंदीच्या दोन दिवसांनी म्हणजेच १० नोव्हेंबरनंतर अशी जवळपास ३००० नवीन खाती आढळून आल्याचे आयकर विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यात १५०० हून अधिक खाती निष्क्रीय होती. ती नोटाबंदीनंतर कार्यान्वित झाली आहेत, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ६० खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर जुन्या नोटांच्या स्वरुपात रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच ती रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्यात किंवा बँक खात्यातून काढण्यात आली आहे. काही रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्यात आली आहे. ही रक्कम काढल्यानंतर लगेच ही खाती बंद करण्यात आली असल्याचेही तपासात आढळून आले आहे. आयकर विभाग या खात्यांची सखोल चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयकर विभागाने आतापर्यंत २५० हून अधिक खातेधारकांना नोटीस बजावली असून, ही यादी आणखीन वाढण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर काही बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जुन्या स्वरुपात जमा झालेल्या रकमेचा आकडा फुगवून सादर केला आहे. या बँकांकडून मिळालेली माहिती रिझर्व्ह बँकेला आयकर विभागाकडून देण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले. नोटाबंदीनंतर अनेक खासगी आणि सहकारी बँका सरकारी यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. मुंबईत १५ डिसेंबरला एका खासगी वाहनात १० कोटी १० लाखांची रोकड पोलिसांनी पकडली होती. त्यात चलनातून बाद केलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा आणि २००० रुपयांच्या नव्या नोटांचाही समावेश होता. ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेची असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीबीआयने वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हाही नोंदवला आहे. यासंबंधी बीड, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईतील ११ ठिकाणीही चौकशी केली आहे. त्यानंतर अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:49 pm

Web Title: income tax department probes co operative banks with 3000 new accounts after demonetisation
Next Stories
1 केंद्रीय मंत्र्याला एअर इंडियाच्या वैमानिकाचे सणसणीत पत्र
2 भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ‘अॅपल’च्या सरकारपुढे अटी
3 मोदींनी घोषणा करण्याच्या अवघ्या ३ तासांपूर्वी आरबीआयने दिली होती नोटाबंदीला मंजुरी
Just Now!
X