नवी दिल्ली/श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहीम राठेर यांचा पुत्र हिलाल राठेर याच्या मालमत्तांवर गुरुवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. कर्ज गैरव्यवहार आणि करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अब्दुल रहीम राठेर हे नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते आहेत. श्रीनगर, दिल्ली, लुधियाना या ठिकाणी असलेल्या आठ मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर अधिकारी पुरावे आणि दस्तऐवजांचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिलाल आणि त्याच्याशी परिचित असलेल्या व्यक्तीने जम्मू-काश्मीर बँकेकडून घेतलेल्या कर्जात करण्यात आलेल्या गैरव्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे. एनसी सरकारच्या राजवटीत हिलालचे वडील अर्थमंत्री होते. प्राप्तिकर विभागाकडून आणि राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोकडून बँकेतील व्यवहाराची तपासणी केली जात आहे आणि त्यांच्यामार्फत छापे टाकण्यात आले असून व्यवहारांची चौकशी केली जात आहे.