आयकर विभागाने शनिवारी सहारा समुहाविरुद्ध केलेल्या धडक कारवाईमुळे समुहाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या समुहाच्या दिल्ली आणि नोएडा येथील कार्यालयांवर आयकर विभागाने अचानक छापे टाकून मोठा मुद्देमाल हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आयकर विभागाच्या हाती सोने आणि तब्बल १०० कोटींची रोकड सापडली असून करचुकवेप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजत आहे. दिल्ली आणि आणखी दोन परिसरात टाकण्यात आलेल्या या छाप्यात रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूदेखील सापडल्या आहेत. दरम्यान, हा सर्व मुद्देमाल समुहाच्याच मालकीचा असल्याची कबुली सहाराच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांकडून कळत आहे.