लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू असतानाच कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारमधील मंत्री सी पुट्टाराजू यांच्या घरावर आयकर विभागाने आज (गुरूवार) छापे टाकले आहेत. आयकर विभागने हसन, मंड्या आणि म्हैसूर येथील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. त्याचबरोबर बांधकाम विभाग आणि सिंचन विभागाच्या १७ ठेकेदार आणि ७ अधिकाऱ्यांच्या घरावरही छापा टाकला आहे. विशेष म्हणजे नुकताच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यात आयकर विभागाचे छापे टाकण्यासाठी देशातील विविध भागातून केंद्राने सीआरपीएफचे जवान तैनात केल्याचा दावा केला होता.

कोण आहेत सी पुट्टाराजू: पुट्टाराजू हे कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारमध्ये सिंचन मंत्री आहेत. ते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मंड्या जिल्ह्याचे प्रभारी देखील आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार आयकर अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांनी मंड्या येथील त्यांच्या घराशिवाय म्हैसूर येथील त्यांच्या भाच्याच्या घरावरही छापे टाकले आहेत. पुट्टाराजू यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, आयकर विभागाचे तीन पथके आणि सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी मंड्यामधील चिन्नाकुरली निवासस्थान आणि म्हैसूर येथील त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

कुमारस्वामी यांनी एकच दिवसापूर्वी याबाबत शंका व्यक्त करत काँग्रेस आणि जेडीएस पदाधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली जाऊ शकते, असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. हा राजकीय बदला घेतला जात असला तरीही आम्ही झुकणार नाही, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.