कर चुकवल्याप्रकरणी चंदिगडमधील वकिलावर प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. वकिलाने ग्राहकाकडून तब्बल २१७ कोटी रुपये रोख स्वीकारल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, हरियाणा आणि दिल्लीमधील ३८ ठिकाणी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटींची रोख रक्कम जप्त केली. वकिलाची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही.

वकिलाचे १० बँक लॉकर्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे. “वाद मिटवण्यासाठी वकील आपल्या ग्राहकांकडून भरीव रक्कम रोख स्वरुपात घेत असल्याचा संशय होता. गेल्या अनेक वर्षांपासून केलेली गुंतवणूक आणि बेहिशोबी रकमेची कागदपत्रं तपासादरम्यान सापडली आहेत,” अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

“वकिलाने एका ग्राहकाकडून ११७ कोटी रुपये रोख रक्कम घेतली होती, पण रेकॉर्डवर फक्त चेकच्या माध्यमातून मिळालेली २१ कोटी दाखवली,” असा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने केला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात त्याने एका कंपनीकडून १०० कोटी रुपये घेतले होते असा दावा आहे.

“हा सर्व पैसा वकील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरत होता. याशिवाय शाळांच्या ट्रस्टमध्येही वापरत होता. पुरावे हाती आलेत त्यानुसार, महागड्या परिसरात त्याने गेल्या दोन वर्षात जवळपास १०० कोटींहून अधिक पैसे संपत्ती विकत घेण्यासाठी खर्च केलेत,” असं सांगण्यात आलं आहे.

याशिवाय वकील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रोख रक्कम देत शाळा आणि संपत्ती विकत घेतल्या. यांची किंमत १०० कोटींहून अधिक आहे अशी माहिती दिली आहे. वकिलाने हवाला फंडमधूनही काही पैसे मिळवले आहेत.