सरकारी सुविधांमध्ये अग्रक्रम देण्याचे धोरण विचाराधीन

काळे पैसे बाळगणाऱ्यांवर छापे, कारवाई, दंडाच्या नोटिसा यासाठी प्रसिद्घ असलेल्या प्राप्तिकर विभागाकडून येत्या काळात आपल्याला नोटीस आली, तर उगीच धडकी भरवून घेऊ नका.. तुम्ही प्रामाणिकपणे कर भरत असल्याबद्दल तुमचा जाहीर सत्कार करण्याबाबतचे ते आमंत्रणही असू शकते!

इतकेच नव्हे, तर सातत्याने प्राप्तिकर भरत आलेल्या अशा प्रामाणिक करदात्यांना सरकारी सेवांत अग्रक्रम दिला जाणार असून, त्यांची करविषयक कामेही वेगाने केली जाणार आहेत. तशी योजना प्रस्तावित आहे.  याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, की वेळेत व पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांबाबत सदिच्छा व्यक्त करण्याचे धोरण प्राप्तिकर खाते तयार करीत असून, त्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एक समितीही नेमली आहे. अर्थ मंत्रालय या प्रस्तावाची तपासणी करीत आहे. त्याला पंतप्रधान कार्यालयाची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याआधीच बंगळूरुतील केंद्रीय प्रक्रिया केंद्राबाबतची टिप्पणी मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आली आहे. करदात्यांची व त्यांची प्राप्तिकर विवरणपत्रे यांची माहिती केंद्रीय प्रक्रिया केंद्रात संकलित होते व तेथून लगेच परताव्याची रक्कम करदात्यांना अदा केली जाते. ज्यांचा उत्पन्नाचा एकच स्रोत आहे अशांच्या कर विवरणपत्राचा निपटारा हा काही तासांतच केला जात आहे. विस्तारित योजनेत प्रामाणिक करदात्यांना सेवेत अग्रक्रम दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर अधिकाऱ्यांच्या परिषदेत गेल्या वर्षी सांगितले होते की, प्रामाणिक करदात्यांना सेवा अग्रक्रमाने मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर प्रामाणिक व सातत्याने करभरणा करणाऱ्या करदात्यांना नागरी कार्यक्रमात बोलावून त्यांचा सत्कार करण्याची योजना आखण्यात आली.

यापूर्वी प्रत्यक्ष कर मंडळाने कर भरणाऱ्या व्यक्तींना आभाराचे संदेश किंवा ईमेल पाठवले होते. त्याच कल्पनेचा आता विस्तार केला जात आहे.  सध्या देशात ८ कोटी प्राप्तिकरदाते असून त्यात पुढील मार्चपर्यंत १.२५ कोटींची भर पडावी असे उद्दिष्ट प्रत्यक्ष कर मंडळाने ठेवले आहे.

फळ प्रामाणिकपणाचे

  • प्रामाणिक करदात्यांना वेगळा ओळख क्रमांक दिला जाईल. त्यांचा पॅन क्रमांकही विशिष्ट पद्धतीने प्रदर्शित केला जाईल.
  • विमानतळ, रेल्वे स्थानक, महामार्गावरील टोल नाके येथे सेवेत अग्रक्रम दिला जाईल.