नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्या १ लाख १६ हजार लोकांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करुन त्यानंतर आयकर न भरल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करुन आयकर भरणारेही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

‘नोटाबंदीनंतर २५ लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करणाऱ्या लोकांची संख्या १८ लाख इतकी होती. या १८ लाखांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणारे आणि १० ते १५ लाख रुपये जमा करणारे, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत,’ अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली. ‘नोटाबंदीनंतर बँकांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्या १ लाख १६ हजार लोकांनी आतापर्यंत आयकर भरलेला नाही,’ असेही त्यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

‘२५ लाखांहून अधिकची रक्कम बँकेत बँका भरणाऱ्या १ लाख १६ हजार लोकांनी अद्याप आयकर भरलेला नाही. त्यांना पुढील ३० दिवसांमध्ये आयकर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे,’ असे चंद्रा यांना सांगितले. नोटाबंदीनंतर १० ते २५ लाख रुपये बँकेत जमा करुन अद्याप आयकर न भरलेल्यांची संख्या २.४ लाख इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. या २.४ लाख लोकांना दुसऱ्या टप्प्यात नोटीस बजावली जाणार आहे.

आयकर कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरुन समोर आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आयकर कायद्याखाली २८८ गुन्हे दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा दुपटीने वाढून ६०९ वर जाऊन पोहोचला. यंदाच्या वर्षात आयकर विभागाकडे एकूण १०४६ तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी हे प्रमाण ६५२ इतके होते. आयकर कायद्यांतर्गत दोषी ठरणाऱ्यांची संख्यादेखील यंदा वाढली आहे. गेल्या वर्षी आयकर कायद्याखाली १३ जण दोषी ठरले होते. यंदा हा आकडा ४३ वर जाऊन पोहोचला आहे.