चेन्नईत आयकर विभागाने नोटाबंदीच्या निर्णयानंतरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आयकर विभागाने तब्बल १७० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये तब्बल ७० कोटी रुपयांची रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात आहे. याशिवाय आयकर विभागाने १३० किलो सोनेदेखील जप्त केले आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या घरात आयकर विभागाला हे घबाड सापडले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आयकर विभागाचे छापासत्र सुरू आहे. चेन्नईतील अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. गुरुवारी रात्रीपर्यंत आयकर विभागाने ९० कोटींची रोख रक्कम ताब्यात घेतली होती. याशिवाय १०० किलो सोनेदेखील जप्त केले होते. सकाळपर्यंत आयकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेचा आकडा तब्बल १७० कोटींपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे यामध्ये ७० कोटी रुपयांच्या नोटा या २ हजार रुपयांच्या असल्याने इतक्या नव्या नोटा सराफांकडे कशा आल्या, याचा तपास आयकर विभागाकडून सुरू आहे.

आयकर विभागाने चेन्नईमध्ये काळा पैसा बाळगल्याच्या संशयावरुन आठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापा घातला. या ज्वेलर्सकडून आयकर विभागाने १७० कोटी रुपयांच्या आणि १३० किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असल्याचे आयकर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर आयकर विभागाने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. ११ नोव्हेंबरला चेन्नईमधील ११ ज्वेलर्सवर कारवाई करण्यात आली. यातील काही ज्वेलर्स पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारुन सोने विकत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यानंतर आयकर विभागाने कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आत्तापर्यंत तब्बल २ हजार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली होती. यामध्ये १३० कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.