ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या (एआयएडीएमके) नेत्या व्हीके शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला सध्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी बंगळुरूच्या तुरूंगात कैद आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये शशिकला यांच्याशी संबंधित आणि जया टीव्हीच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात बेनामी संपत्ती बाबत माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते, या छाप्यादरम्यान १४०० कोटी रूपयांहून अधिक अघोषित उत्पन्नाचा पर्दाफाश झाला आहे. या छाप्यामध्ये काय-काय दस्तऐवज आणि वस्तू मिळाल्या याबाबत अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेले नाही.

गेल्या गुरूवारी शशिकला आणि त्यांच्याशी संबंधित विविध १८७ ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या हायप्रोफाइल छाप्यात शशिकला गटात खळबळ उडाली होती. तुरूंगात बंद असलेल्या शशिकला अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवसभर तामिळ वृत्त वाहिन्या आणि विविध वृत्तपत्रातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी शशिकला यांनी यापूर्वीच ४ वर्षांची शिक्षा तुरूंगात भोगली आहे. त्यांच्या सहकारी इलावरासीही याच आरोपाखाली तुरूंगात आहेत. तुरूंगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशिरापर्यंत शशिकला या वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून माहिती घेत होत्या. शनिवारी त्या तुरूंगाच्या वाचनालयात गेल्या, तिथे त्यांनी वृत्तपत्रांचे वाचन केले. प्राप्तिकर विभागच्या छाप्यांमुळे त्या निराश आणि चिंताग्रस्त होत्या, असे सांगण्यात येते.