भारतीय जवानांसोबत झालेल्या चकमकीत चीनचे जवळपास ४३ जवान गंभीर जखमी आणि ठार झाले आहेत. जखमी जवानांना आणि शहीद जवानांचे मृतदेह एअरलिफ्ट करण्यासाठी चीनने नियंत्रण रेषेवर हेलिकॉप्टर मागवली आहेत. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनी हेलिकॉप्टर्सची हालचाल वाढली आहे. या हेलिकॉप्टर्समधून जवानांना एअरलिफ्ट केलं जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आपापसात भिडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. एएनआयने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे जवळपास २० जवान शहीद झाले आहेत. दरम्यान भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिलेलं असून त्याचे जवळपास ४३ जवान ठार तसंच गंभीर जखमी झाले आहेत.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितलं आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान झालं असल्याचं समोर येत आहे.