देशात करोनाची चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात दिली.

३ राज्यांमध्ये ५० टक्के रुग्ण असून ७ राज्यांमध्ये ३२ टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे १० राज्यांत एकूण ८५ टक्के रुग्ण आढळले आहेत. हे पाहता देशात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करता आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, १० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन १४० नमुना चाचण्या घेणे गरजेचे आहे. देशातील ३६ पैकी ३३ राज्यांमध्ये या निकषांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात आहेत. देशात रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून १३७० नमुना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा कार्यरत झाल्या आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

करोनाच्या उद्रेकाची माहिती चीनने जागतिक आरोग्य संघटनेला ७ जानेवारी रोजी दिली. त्यानंतर तातडीने भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले गेले. टप्प्याटप्प्याने बहुस्तरीय संस्थात्मक प्रतिसादामुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात १० लाखांमागे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यात यश आले असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

विकसित देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या व तिची घनता जास्त आहे. जीडीपीच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रासाठी होणारा खर्च अत्यल्प आहे. दरडोई डॉक्टर आणि रुग्णालयांची उपलब्धताही कमी आहे. तरीही भारत तुलनेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक यशस्वी झाल्याचेही हर्षवर्धन म्हणाले.