सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यापासून मूळ वेतनाच्या ८० टक्के असलेला महागाई भत्ता ९० टक्के करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. ही वाढ झाल्यास सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ३० लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ मिळेल.
देशातील महागाई निर्देशांकात झालेल्या वाढीचे प्रतिबिंब महागाई भत्त्यावर पडणे अपरिहार्य होते. त्यानुसार भत्त्यामध्ये सुमारे १० ते ११ टक्क्य़ांनी वाढ होणे अपेक्षित आहे. आणि १ जुलैपासूनच पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू केली जाईल, असा अंदाज आहे.सामान्यपणे अखिल भारतीय पातळीवरील सरत्या १२ महिन्यांचा ग्राहक (खरेदी) किंमत निर्देशांक हा महागाई भत्ता ठरविण्यासाठी आधारभूत मानला जातो. त्यामुळे जुलै २०१२ ते जून २०१३ कालावधीतील निर्देशांक नव्या निर्णयासाठी ग्राह्य़ धरला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.