कोविड निर्बंधांचे पालन लोक कमी प्रमाणात करीत आहेत, त्याशिवाय कोविडच्या जास्त संसर्गजन्य विषाणूचे प्रकार भारतातही आले आहेत, यामुळे सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे, असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या देशात करोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांची संख्या काही राज्यात वेगाने वाढताना दिसत आहे.

गुलेरिया यांनी सांगितले, की जर ही स्थिती बदलली नाही तर संसर्ग वाढून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल. त्यामुळे कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्बंधांचे पालन करण्यात ढिलाई दाखवता कामा नये. प्रशासन व अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर लोकांचे वर्तन  कोविड प्रतिबंधक असेच  राहील याची काळजी घ्यावी. फेब्रुवारीच्या सुमारास जेव्हा रुग्णवाढ कमी होत होती, तेव्हा लोकांनी नंतर कोविड प्रतिबंधक वर्तनात ढिलाई केली. विषाणू आता कमकुवत झाला किंवा तो गेला असे समजून लोकांचे वर्तन सुरू होते. लोक आता हा विषाणू फार गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. जर तुम्ही बाजारपेठा, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल येथे गेलात तर तेथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसेल. याच ठिकाणांहून करोनाचा प्रसार होत असतो हे ध्यानात ठेवा. याआधी जर एक रुग्ण आजारी पडला तर त्याच्या संपर्कातील तीस टक्के व्यक्ती बाधित होत असत आता त्यापेक्षा अधिक लोकांना एका व्यक्तीकडून संसर्ग होत आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग व दर वाढला असून जास्त वेगाने पसरणारे करोना विषाणू सध्या भारतात आहेत.

सार्स कोव्ह २ या विषाणूचे ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमधील प्रकार आता भारतात आले आहेत व ते जास्त प्रसार करणारे आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे.

‘गरज भासल्यास कर्नाटकात टाळेबंदी’

गरज भासल्यास राज्य सरकार कर्नाटकमध्ये टाळेबंदी जाहीर करू शकते, असे राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी सांगितले. जनतेने स्वत:च्या हितासाठी योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे, मात्र तसे झाले नाही तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, गरज भासल्यास आम्ही टाळेबंदी जाहीर करू, असे येडियुरप्पा यांनी बीदर येथे वार्ताहरांना सांगितले.