दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लवकरच अतिरिक्त ३०० आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली पालिकेच्या अखत्यारीतील काही रुग्णालये कोविड रुग्णालयांत रूपांतरित करण्यात येणार असून मनुष्यबळाच्या अभावामुळे डॉक्टर आणि निमवैद्यकीय दले तैनात केली जाणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने शहा यांनी रविवारी एका बैठकीत राजधानीतील स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीला नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि केंद्र सरकारचे अधिकारी हजर होते. शहा यांनी स्थितीचा आढावा घेतला आणि त्याचा मुकाबला कसा करावयाचा याबाबत चर्चा केली, असे गृहमंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

चाचण्यांत वाढ..

* दिल्लीतील दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार असून चाचणी प्रयोगशाळाही वाढविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जेथे करोनाचा संसर्ग होण्याची भीती अधिक आहे त्या परिसरांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या फिरत्या चाचणी व्हॅन तैनात केल्या जाणार आहेत, असे शहा यांनी ट्वीट केले आहे.

* दिल्लीत ३,२३५ नवे करोनाबाधित आढळल्याने बाधितांची एकूण संख्या ४.८५ लाखांवर पोहोचली आहे, तर आणखी ९५ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७६१४ वर पोहोचली आहे. सणासुदीचा काळ, तापमानातील घट आणि प्रदूषण या पार्श्वभूमीवर करोना कशा प्रकारे नियंत्रणात आणता येईल याची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.